अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी दिली संस्थेच्या योजनांची माहिती
अकोला : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ अभिरुची गार्डन येथे उत्साहात पार पडला. या वेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, अकोला जिल्हाध्यक्ष श्याम कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्ष शकुनाताई परांजपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी अकोला जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्षपदी श्याम नारायण कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपाध्यक्षपदी दीपक सीताराम जोशी, कपिलराव देव, नगरसेवक नीलेश देव, श्रीकांत जोशी, राजेंद्र वारे, नगरसेवक प्रशांत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. महासचिव म्हणून बाळकृष्ण जोशी, कोषाध्यक्षपदी संजय देशमुख, तर युवा अध्यक्षपदी अक्षय गंगाखेडकर यांची नियुक्ती झाली.
अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी संघटनेची ध्येयधोरणे व कार्यपद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी संघटनेचा विस्तार, सदस्य नोंदणी व संघटन बळकटीकरणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. जोशी यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम व त्यातून युवक-युवतींना मिळणाऱ्या लाभांची सविस्तर माहिती दिली. बेरोजगार युवक, उद्योजक होऊ इच्छिणारे नागरिक आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी या योजनांचा कसा लाभ घ्यावा, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या माहितीपूर्ण भाषणाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर हेही उपस्थित होते.
कार्यक्रमात उदय महा यांची राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व गोवा राज्य संघटनमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. तसेच निखिल लातूरकर यांनी राजेंद्र टाकळकर यांची विदर्भ संघटनमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर केली. अकोला महानगर अध्यक्षपदी अतुल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी केले, तर आभारप्रदर्शन शकुनाताई परांजपे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता आनंद जहागीरदार व राजेश जोशी यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment