महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने युवक-युवती आणि इच्छुक उद्योजकांसाठी आयोजित १० दिवसीय मोफत अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्हा कार्यालयात झाले. विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी उद्योगाची योग्य निवड आणि व्यवसाय नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणातून व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, शासकीय योजना, विपणन कौशल्य आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने युवक-युवती आणि इच्छुक उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित १० दिवसीय मोफत अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात झाले.
यावेळी अमृतचे विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारणे ही काळाची गरज आहे. व्यवसायात सातत्य, सचोटी, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता जपली तर यश निश्चित मिळते. व्यवसाय करताना मेहनत आणि सातत्याला सर्वाधिक महत्त्व आहे.”
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योगाची निवड कशी करावी, व्यवसायाचे नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, शासकीय योजनांचा लाभ, विपणन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधी याबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. “नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे उद्योजक घडविणे” हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
उद्योगाची योग्य निवड कशी करावी, व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा आणि उपलब्ध संधींचा उपयोग कसा करावा, याबाबत अमृतचे विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांची गरज आणि व्यवसायाचे नियोजन याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
हे प्रशिक्षण २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून युवक-युवती तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाचे आयोजन अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सामंत आणि विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे,अमृत सखी मंजू कुलकर्णी, अमृत सखी रुचा शर्मा यांच्यासह प्रशिक्षणार्थी व लाभार्थी उपस्थित होते.
संपर्क : 7391065475 / 940320060
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment