अमृत संस्था आणि 'एमसीईडी'चे संयुक्त आयोजन
यवतमाळ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम यवतमाळमध्ये सुरू आहे. या प्रशिक्षणार्थ्यांनी नुकतीच यवतमाळमधील बंजारा क्लस्टर युनिट येथील औद्योगिक क्षेत्राला भेट दिली.
त्या वेळी प्रशिक्षणार्थ्यांना ड्रेस डिझायनिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया, आधुनिक मशिनरी, कच्चा माल, दर्जेदार उत्पादन पद्धतीचे थेट निरीक्षण करण्याची संधी मिळाली. बाजारपेठेतील विविध संधींचे आकलनही त्यांना त्यामुळे झाले. त्यामुळे त्यांच्या व्यावहारिक कौशल्यविकासाला आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने तयारीला मोठी चालना मिळेल.
या औद्योगिक भेट कार्यक्रमात अमृत संस्थेचे यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा, जिल्हा उपव्यवस्थापक कामेश राखे, अमृतसखी भार्गवी लाखे, 'एमसीईडी'चे प्रकल्प अधिकारी रूपेश शिरूरकर, अशोक कांबळे, संजय जामणिक, सौ. वर्षा निघोट मॅडम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. विविध उद्योगप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांनी उद्योगातील विविध टप्प्यांचे निरीक्षण केले. प्रश्न विचारले. त्यामुळे त्यांना उद्योजकतेसाठी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला.
अमृत आणि एमसीईडी यांच्या ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ही भेट पूर्णपणे साजेशी ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील महिला व युवतींना ड्रेस डिझायनिंग क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या कार्यक्रमाद्वारे अमृत संस्था जिल्ह्यातील महिला व युवतींना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. अशा भेटींमुळे प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढेल आणि लाभार्थ्यांना उद्योग क्षेत्रात प्रवेश करणे सुलभ होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
परीक्षित कमलकिशोर शर्मा - ९११२२२७६३३
यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-वन, अवधूतवाडी,
तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment