उत्पादक ते ग्राहक : थेट बाजारपेठेचे व्यवस्थापन निःशुल्क शिकण्याची संधी; पुण्यात प्रशिक्षण

उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या वाढीसाठी अमृत संस्थेकडून आयोजन; २७ जानेवारीपूर्वी करा नावनोंदणी

उत्पादक ते ग्राहक : थेट बाजारपेठेचे व्यवस्थापन निःशुल्क शिकण्याची संधी; पुण्यात प्रशिक्षण मुख्य फोटो
उत्पादक ते ग्राहक : थेट बाजारपेठेचे व्यवस्थापन निःशुल्क शिकण्याची संधी; पुण्यात प्रशिक्षण अतिरिक्त फोटो

पुणे : छोटासा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे प्रगतीकडे टाकलेले पहिले पाऊल असते. अशा प्रकारे उद्योजक उभे करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने काम करत असलेल्या या संस्थेने अमृतपेठ डॉट कॉम हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म काही दिवसांपूर्वी सुरू केला आहे. आता अमृतपेठच्या माध्यमामधून शहराशहरांमध्ये प्रत्यक्ष बाजारही भरवला जाणार आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना हक्काची थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश असून, पहिल्या टप्प्यात राज्याच्या सर्व विभागांमधील काही निवडक जिल्ह्यांमध्ये ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्याकरिता 'थेट बाजारपेठ भरवण्याचे व्यवस्थापन' हा अभ्यासक्रम अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येत असून, या काही निवडक जिल्ह्यांमधून 'अमृतपेठ (थेट बाजारपेठ व्यवस्थापन)' हा अभ्यासक्रम शिकण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. (जिल्ह्यांची यादी बातमीच्या शेवटी दिली आहे.)

या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम साधारणत: तीन महिन्यांचा असेल. याची पहिली बॅच येत्या आठवड्यापासून सुरू करण्यात येत आहे. प्रारंभी तीन दिवसांचा निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम पुण्यात घेतला जाणार असून, २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेबारापर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

'अमृतपेठ - थेट बाजारपेठ व्यवस्थापन' या नावाचा हा प्रशिक्षण कार्यक्रम २८ जानेवारी २०२६पासून पुण्यात सुरू होत आहे. तीन दिवसांच्या या निःशुल्क, निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात खुल्या प्रवर्गातील खाली दिलेल्या जातींमधील उमेदवार सहभागी होऊ शकतात. बातमीच्या शेवटी दिलेल्या यादीतील जिल्ह्यांमधील उमेदवार या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक जिल्हा पातळीवर दोन आणि विभागीय पातळीवर एका उमेदवाराची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड अमृत संस्थेच्या संबंधित जिल्ह्याच्या व्यवस्थापकांकडून केली जाणार आहे.

उत्पादक ते थेट ग्राहक अशा बाजारपेठेच्या व्यवस्थापनाचे विविध मुद्दे, ग्राहकांच्या गरजा, अमृतपेठ ऑपरेशन, नेतृत्व कौशल्य आदी बाबींचे प्रशिक्षण या प्रशिक्षणामध्ये दिले जाणार आहे. यासाठी या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांची निवड करण्यात आली असून, पुण्या-मुंबईत ४७ ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याच्या बाजारपेठा उत्तम रीतीने चालवण्याचा अनुभव त्यांना आहे. पुण्यातील तीन दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत थिअरी तर शिकवली जाईलच; पण अशा बाजारपेठांमध्ये उमेदवारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामधून प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांना 'हँड्स ऑन ट्रेनिंग'साठी आपापल्या जिल्ह्यात अमृतपेठ बाजारपेठ सुरू करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. त्यात ते अनेक छोट्या विक्रेत्यांच्या मालाची थेट उत्पादक ते ग्राहक संकल्पनेद्वारे विक्री करू शकतात. तसेच, त्यांना समन्वयक म्हणून इंटर्नशिपही करता येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी प्रमाणपत्रही मिळेल. प्रशिक्षणाचा पहिला एक महिना परिविक्षाधीन कालावधी असेल. त्यात चांगली कामगिरी असल्यास पुढचे तीन महिने 'कमवा आणि शिका' तत्त्वावर उमेदवारांना काम करता येईल. त्यातही उत्तम कामगिरी केल्यास 'अमृतपेठ'मध्ये नियमित कामकाजासाठीही निवड होऊ शकते.

अमृतपेठ बाजारपेठेत आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी उत्पादकांकडून अल्प शुल्क घेतले जाईल; मात्र विक्रीमागे कोणतेही कमिशन किंवा अन्य खर्च घेतला जाणार नाही. त्यामुळे उत्पादकांसाठी ही बाजारपेठ फायद्याची ठरणार आहे. उत्पादक ते थेट ग्राहक अशा विक्रीचे प्रयोग शेतीमालासाठी काही ठिकाणी झाले आहेत; मात्र अन्य उत्पादनांसाठी नियमित स्वरूपात कायमस्वरूपी थेट बाजारपेठेमार्फत विक्री असे प्रयोग शासनातर्फे झालेले नाहीत. म्हणूनच ही एक वेगळी संकल्पना आहे.

पात्रता : खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, भूमिहार, नायडू, एलमार, नेपाळी हिंदू इत्यादी २४ जातींचा समावेश आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या या जातींमधील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला (डोमिसाइल सर्टिफिकेट), कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला आणि जातीचा उल्लेख असलेला कोणताही सरकारी पुरावा

इच्छुक उमेदवारांनी पुढील लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करावी :https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/284

अंतिम मुदत : २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेबारापर्यंत

ज्या जिल्ह्यांसाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे, त्या जिल्ह्यातील अमृत संस्थेच्या व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक येथे दिले आहेत. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्याच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे : सिद्धेश केसकर - 9112228767

रत्नागिरी : संतोष जुवळे - 9112228761

रायगड : मंगेश ढेबे/शैलेश मराठे - 9112228759

मुंबई : राजेश पवार - 9112228763

अमरावती : केदार गोगरकर - 9112227635

सांगली : शैलेंद्र जहागीरदार - 9112228766

कोल्हापूर : प्रशांत जोशी - 9112228764

परभणी : अनिरुद्ध काटे - 7391065473

नाशिक : दीपक गुप्ता - 9112228770

अहिल्यानगर : सागर भोपे - 9112228769

नागपूर : हर्षल गद्रे - 9112228773

चंद्रपूर : विक्रम पांडे - 9112228774

गोंदिया : कार्तिक तिवारी - 9112228776

बुलढाणा : जिग्नेश कमानी - 9112227637

छत्रपती संभाजीनगर : अक्षय लंबे - 7391065475

नांदेड : सौरभ माळहिप्परगेकर - 7391065472

सोलापूर : श्रेयस कुलकर्णी - 9112228768

यवतमाळ : परीक्षित शर्मा - 9112227633


Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 02:54 PM News publication time | Views: 2,447 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 02:54 PM News publication time | Views: 2,447 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words