अमृत संस्थेच्या बुलढाणा कार्यालयात येऊन घेतली योजनांची माहिती
बुलढाणा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात अग्रवाल समाजातील महिलांनी भेट दिली. त्यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना व कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
या वेळी उपस्थित महिलांनी उद्योग उभारणी, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन घेतले. याबाबत त्यांनी मोठ्या उत्साहाने प्रश्न विचारले. अमृत संस्थेकडून महिलांना उद्योग सुरू करण्याच्या संधी, उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग, विक्री, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक नियोजन आणि शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याची सविस्तर माहिती देण्यात आली.
महिलांमध्ये वाढत असलेली उद्योजकतेची जाणीव आणि आत्मनिर्भरतेची आकांक्षा यातून अधोरेखित झाली. घरगुती उद्योग, लघुउद्योग, तसेच नवउद्योजकतेकडे महिलांचा वाढत असलेला कल या भेटीतून स्पष्टपणे दिसून आला.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले, की 'आजच्या काळात महिला केवळ रोजगार शोधणाऱ्या नाहीत, तर रोजगार निर्माण करणाऱ्या बनत आहेत. अमृतच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे महिलांना आत्मविश्वास, कौशल्य आणि योग्य दिशा मिळणार आहे.'
या माहिती सत्रामुळे अग्रवाल समाजातील महिलांना अमृत संस्थेच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. आगामी काळात मोठ्या संख्येने महिला प्रशिक्षणात सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
जिग्नेश कमानी - 9112227637
बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय,
फ्लॅट क्र. 305, तिसरा मजला,
बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर,
बुलढाणा – 443001
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment