खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना उत्तम संधी; प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर भर
चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याची पहिली बॅच ३० जानेवारी २०२६पासून सुरू होणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी १८ दिवसांचा असणार आहे. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.
बेकरी उद्योगामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, तसेच युवक, महिला व नवउद्योजकांना कौशल्याधारित प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने अमृत संस्थेच्या माध्यमातून हे निःशुल्क बेकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात केक, ब्रेड, बिस्किटे, पेस्ट्री, खारी इत्यादी बेकरी पदार्थ तयार करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. यात प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर अधिक भर दिला जाणार आहे. बेकरी व्यवसाय सुरू करताना लागणारी उपकरणे, कच्चा माल, खर्चाचे नियोजन, पॅकिंग, ब्रँडिंग व विक्री व्यवस्थापन याबाबतही सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामुळे सहभागी प्रशिक्षणार्थींना स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व आत्मविश्वास मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी अमृत संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे - 9112228774
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402
ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment