पुढील वाटचालीसाठी देण्यात आल्या शुभेच्छा
अहिल्यानगर : वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे दंडक्रम पारायण पूर्ण करणारे अहिल्यानगरचे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे गुरुजी यांचा अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. हे पारायण पूर्ण केल्यामुळे दंडक्रम महाविक्रमादित्य, दंडक्रम वाचस्पती, शुक्ल यजुर्वेदालंकार बनलेल्या वेदमूर्ती देवव्रत रेखे गुरुजींनी अहिल्यानगरचे नाव देशातच नव्हे, तर जगभरात उज्ज्वल केले. त्यांच्या या धवल यशाबद्दल अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे विशेष अभिनंदनपत्र त्यांना देण्यात आले. अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी हे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना अमृत दिनदर्शिकाही भेट देण्यात आली. रेखे गुरुजींचा सन्मान करण्याचा योग अत्यंत सौभाग्याचा आणि प्रेरणादायी आहे, अशी भावना संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली. अमृत संस्थेच्या मुख्यालयाला भेट देण्याची विनंती त्यांना करण्यात आली.
महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या श्रुतिस्मृति ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांच्या विक्रमी पारायणाची चर्चा साऱ्या देशात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केल्यावर जगभर झाली. अवघ्या १९ वर्षे वयाच्या या वेदमूर्तींनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. कार्तिक कृष्ण षष्ठी ते मार्गशीर्ष कृष्ण दशमी अर्थात १२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या ५० दिवसांच्या कालावधीत १६५ तासांपेक्षा जास्त काळ चाललेले हे पारायण त्यांनी एकाकी म्हणजेच ग्रंथ न पाहता अनेक विद्वानांच्या साक्षीने पूर्ण केले. वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात हे विक्रमी पारायण पूर्ण झाल्यानंतर काशीमध्ये भव्य शोभायात्रा काढून त्यांचे अभिनंदन आणि गौरव करण्यात आला.
वैदिक मौखिक परंपरेतल्या आठ विकृतींपैकी 'दंडक्रम' सर्वांत कठीण आणि विलक्षण आहे. असे हे अत्यंत कठीण 'दंडक्रम' पारायण जगाच्या पाठीवर आणि इतिहासात फक्त दुसऱ्यांदा झाले आहे. दोनशे वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांनी दंडक्रम पारायण केले होते. श्री क्षेत्र काशी येथे अनेक मान्यवर आणि विद्वज्जनांच्या उपस्थितीत दंडक्रम विक्रमादित्य ही पदवी देवव्रत रेखे यांना प्रदान करण्यात आली.
शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेचे दंडक्रम पारायण करताना पदांची संख्या सुमारे २५ लाख होते. त्यातील शब्दांची एकत्रित संख्या एक कोटीहून अधिक होते. वेदपठणातील दंडक्रम पद्धत ही मंत्रांच्या पुढे-मागे क्रमाने, विविध पदक्रमांतून, पूर्ण कंठस्थ स्वरूपात आणि श्वासाच्या शुद्ध लय-तालात केली जाणारी एक उच्च दर्जाची साधना मानली जाते. असे पारायण दुर्मीळ असते. अल्पवयात एवढी प्रगल्भ साधना करणाऱ्या देवव्रत रेखे यांच्या नावाचा म्हणूनच डंका पिटला जात आहे. युवा वेदमूर्तींनी केलेले हे पारायण म्हणजे केवळ त्यांच्या वैयक्तिक तपस्येचे प्रतीक नसून, आधुनिक पिढीत वेदाध्ययनाबद्दलची नवी प्रेरणा निर्माण करणारे ठरत आहे, असे मत अनेक विद्वानांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment