विशेष बैठकीला मिळाला चांगला प्रतिसाद
परतवाडा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी परतवाडा येथे ओंकार सिंधी नवयुवक बहुउद्देशीय संस्थेतर्फे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. अमृत संस्थेमार्फत लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण, कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती व कर्जावरील व्याजपरतावा अशा विविध रोजगाराभिमुख योजनांची सविस्तर माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली. योजनांचा लाभ कोण घेऊ शकतो, अर्जप्रक्रिया कशी आहे, तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती याबाबत अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हा उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर यांनी उपस्थित नागरिकांच्या शंकांचे समाधान केले. तसेच अमृत संस्थेच्या योजनांमुळे स्वावलंबी होण्याची संधी मिळत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. या बैठकीमुळे परिसरातील लक्ष्यित गटातील नागरिकांना अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मिळाली असून, अधिकाधिक गरजू नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक विजय थावणी यांनी केले.
या वेळी अकोला जनता सहकारी बँकेचे परतवाडा शाखा व्यवस्थापक विजय अग्रवाल उपस्थित होते. 'सर्व आवश्यक कागदपत्रे व योग्य व्यवसाय प्रकल्प अहवाल असल्यास आम्ही लाभार्थ्यांना निश्चितपणे सहकार्य करू,' असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अजय छाबडा, मुख्य आयोजक ॲड. संदीप गुलाबचंद रेवलानी, नगरसेवक विजय थावणी, अमर खतवानी, गोविंद रेवलानी, रोहित साधवानी, तसेच सिंधी समाजातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
केदार गोगरकर - ९११२२२७६३५
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment