प्रशिक्षणातून थेट व्यवसायाकडे वाटचाल

रत्नागिरीतील अमृत बेकरी प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचला प्रशिक्षण सुरू असतानाच मिळाली पहिली व्यावसायिक ऑर्डर

प्रशिक्षणातून थेट व्यवसायाकडे वाटचाल   मुख्य फोटो
प्रशिक्षणातून थेट व्यवसायाकडे वाटचाल   अतिरिक्त फोटो

रत्नागिरी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या रत्नागिरी कार्यालयातर्फे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने रत्नागिरीत निःशुल्क बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. प्रात्यक्षिकांवर भर देणाऱ्या प्रशिक्षणाच्या पहिल्याच बॅचमधील दोन प्रशिक्षणार्थींना त्यांनी तयार केलेल्या पदार्थांच्या आधारे लगेचच व्यावसायिक ऑर्डर मिळाली आहे. त्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्याच्या आतच त्यांना मिळालेल्या या ऑर्डरमुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाची गुणवत्ता आणि उपयुक्तता अधोरेखित झाली आहे.

हा बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सध्या रत्नागिरीत अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे. युवक-युवतींना स्वयंरोजगाराकरिता सक्षम करण्याचा उद्देश या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आहे. या प्रशिक्षणामध्ये बेकरी व्यवसायाचे महत्त्व, उत्पादनांची व्याप्ती व बाजारातील संधी, आधुनिक उत्पादन तंत्रे, आवश्यक उपकरणे, गुणवत्ता नियंत्रण, अन्नसुरक्षा व वैयक्तिक स्वच्छता, तसेच आरोग्य व सुरक्षा पद्धती या बाबी उत्तम रीतीने शिकवल्या जात आहेत. स्नेहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात होत असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सैद्धांतिक मार्गदर्शनासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत असून, अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींना उद्योगाभिमुख कौशल्यांचे धडे दिले जात आहेत. स्त्री-पुरुष प्रशिक्षणार्थींची मिश्र बॅच असून, सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या उत्साहाने व एकोप्याने प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होत आहेत.

प्रशिक्षणार्थींना केक, कुकीज, खारी बिस्किटे, लादी पाव, स्लाइस ब्रेड, पिझ्झा बेस, तसेच टॉफीज व चॉकलेट्स यांसारख्या विविध बेकरी उत्पादनांची निर्मिती प्रात्यक्षिकांच्या आधारे शिकवली जात आहे. गुणवत्तेवर दिलेला भर आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेतील सहभाग यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आत्मविश्वास, व्यावसायिक दृष्टिकोन व उद्योजकतेची जाणीव अधिक दृढ होत आहे.

प्रशिक्षण सुरू असताना अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देऊन प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या बेकरी पदार्थांची पाहणी केली. पदार्थांची गुणवत्ता, प्रशिक्षणाची शिस्त व एकूण व्यवस्थापन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून स्थानिक पातळीवर सक्षम व आत्मनिर्भर उद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त केला.

या बेकरी प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षणार्थींना उद्योजकता विकास, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजनांची माहिती, अकाउंट्स व बँक कर्जविषयक मार्गदर्शन करण्यात येणार असून, प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव मिळावा यासाठी औद्योगिक भेटींचे आयोजनही करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योग सुरू करावा, हे अमृत संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या बॅचचे सर्वांत उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हे उद्दिष्ट त्यांचे प्रशिक्षण चालू असतानाच प्रत्यक्षात उतरले आहे. पहिल्याच बॅचमधील दोन प्रशिक्षणार्थींना त्यांनी तयार केलेले केक व पफ-खारीचे सोशल मीडियावर प्रसारित झालेले फोटो पाहून त्वरित पहिली व्यावसायिक ऑर्डर मिळाली. प्रशिक्षण कालावधीतच मिळालेली ही ऑर्डर म्हणजे या प्रशिक्षणाची गुणवत्ता, उपयुक्तता व परिणामकारकतेची ठळक साक्ष ठरली आहे.

यापुढील काळातही अमृत संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयातर्फे विविध कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ अधिकाधिक युवक-युवती व महिलांनी घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक संतोष जुवळे व उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये यांनी केले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या उद्योजक घडवण्याच्या संकल्पनेत अमृत संस्थेचे योगदान मोलाचे असेल, हा विश्वास यातून दृढ झाला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत रत्नागिरी जिल्हा कार्यालय,

प्लॉट नं १७, घर नंबर ७०७/ड ४,

माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पाठीमागे,

हॉटेल सिंधुदुर्गसमोर, साळवी स्टॉप

रत्नागिरी - ४१५६१२

मोबाइल नं : 9112228761

ई-मेल - amrut.ratnagiri.dm@gmail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Avadhoot Mulye News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 03:43 PM News publication time | Views: 855 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Avadhoot Mulye News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 03:43 PM News publication time | Views: 855 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words