खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी निःशुल्क प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
चंद्रपूर : अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात १९ दिवसांचे निःशुल्क निवासी सोलर पॅनेल दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण २२ जानेवारी २०२६पासून सुरू होत आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
हरित ऊर्जेच्या क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन युवकांना रोजगारक्षम व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने हे अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये लाभार्थ्यांना सोलर पॅनेलची दुरुस्ती, देखभाल, इन्स्टॉलेशन, तसेच टेंडरिंग प्रक्रियेचे सखोल सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण काळात औद्योगिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि सौर क्षेत्रातील अनुभवी उद्योजकांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी उमेदवार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, अशा प्रकारे त्यांना पूर्णपणे सक्षम करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणार्थींकरिता नाश्ता, जेवण, चहा व निवासाची उत्कृष्ट व पूर्णपणे मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट देऊन अथवा फोनवरून संपर्क साधून सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अटी
१. अर्जदार अमृतच्या लक्ष्यित गटातील असावा.
२. उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. त्यासाठी संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.
३. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अधिवास दाखला असावा.
४. अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण असावा.
५. उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
६. अर्जदार स्वतः उद्योग करण्यासाठी इच्छुक असावा.
७. प्रशिक्षण कार्यक्रम कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्ण वेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.
८. या कालावधीत उमेदवाराने या योजनेसारख्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे - 9834323727
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment