संस्थेला साह्य करण्याचे दिले आश्वासन
नाशिक : नुकत्याच झालेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत नगरसेविका म्हणून दीपाली कुलकर्णी निवडून आल्या. त्यांनी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नाशिक कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी कुलकर्णी यांना अमृत संस्थेच्या विविध सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजनांची, तसेच दुर्गोत्सव, अमृतपेठ, अमृत महाराष्ट्र यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. संगणकसखी हर्षाली पुराणिक यांनी कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ व अमृत दिनदर्शिका देऊन सत्कार केला.
अमृत संस्थेच्या लोकोपयोगी व रोजगाराभिमुख उपक्रमांचे कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले. आपल्या प्रभागातील लक्ष्यित गटातील नागरिकांपर्यंत 'अमृत'चे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने पोहचवण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. लक्ष्यित गटासाठी सदैव कार्यरत राहून, अधिकाधिक नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी आपण नक्कीच संस्थेला साह्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी दीपाली कुलकर्णी यांचे पती सचिन कुलकर्णीदेखील उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment