लक्ष्यित गटातील समाजबांधवांना 'अमृत'च्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे दिले आश्वासन
नाशिक : नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले उमेदवार अजिंक्य साने यांनी अमृत संस्थेच्या नाशिक कार्यालयाला भेट दिली. अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनातील पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 'या सत्कारामुळे मला अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे बळ मिळाले,' असे मनोगत साने यांनी या वेळी व्यक्त केले.
मंगेश खाडिलकर यांनी अजिंक्य साने यांना या वेळी अमृत संस्थेच्या विविध योजनांबाबत सखोल माहिती दिली. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी कार्यरत असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना संस्थेतर्फे राबवल्या जातात. अजिंक्य सानेंनी त्यांच्या प्रभागातील अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांना संस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या वेळी अतुल शिंगणे, अमृतमित्र मयूर हातवळणे उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment