यवतमाळच्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये योजनांच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केले प्रेरणादायी मनोगत
यवतमाळ : प्रशिक्षणासाठी मिळालेले अर्थसाह्य, कौशल्यवर्धन करणारे प्रशिक्षण, तसेच कर्ज व्याजपरतावा योजनेतून मिळालेला लाभ अशा विविध प्रकारे अमृत संस्था आपल्या पाठीशी उभी राहिल्याने आपल्या जीवनात प्रगतीसाठी मोठा हातभार लागला अशा भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात अमृत संस्थेच्या विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी अमृत संस्थेच्या योजनांमुळे झालेला प्रत्यक्ष लाभ व वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात झालेला सकारात्मक बदल या वेळी उपस्थितांसमोर मांडला. अमृत संस्थेचे कार्य समाजात कसे परिवर्तन घडवून आणते आहे, हे उपस्थितांना या वेळी 'याचि देही याचि डोळा' अनुभवता आले.
जीसीसी व टीबीसी योजनेच्या लाभार्थी भार्गवी लाखे यांनी आपल्याला टायपिंग प्रशिक्षणासाठी मिळालेल्या आर्थिक साह्यामुळे कौशल्यविकासाची संधी मिळाल्याचे आणि त्यामुळे आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढल्याचे त्यांनी सांगितले.
'सी-डॅक' योजनेच्या लाभार्थी सानिका पांडे यांनी कौशल्यवर्धन व प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्याचा अनुभव सांगितला.
वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचे लाभार्थी प्रशांत परसोळकर यांनी कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी झाल्याने व्यवसायवृद्धीला मोठी मदत झाल्याचे नमूद केले. याच योजनेच्या आणखी एक लाभार्थी खुशबू नीलेश मिश्रा यांनी अमृत संस्थेच्या साह्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळाल्याचा विश्वास व्यक्त केला.
ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी भूषण बापट यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणामुळे नव्या करिअरसंधी निर्माण झाल्याचे सांगितले.
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांद्वारे समाजातील विविध घटकांना उद्योग, रोजगार व कौशल्यविकासाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू असल्याचे यातून स्पष्ट झाले. उपस्थित व्यावसायिक व उद्योजकांनी या योजनांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी संपर्क :
परीक्षित कमलकिशोर शर्मा – ९११२२२७६३३
यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : यवतमाळ जिल्हा कार्यालय
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए–१, अवधूतवाडी,
तिवारी चौक, यवतमाळ – ४४५ ००१
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment