छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीला चांगला प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : स्वर्गीय शंकरलाल बुटेले सामाजिक संस्था यांच्या वतीने सिडको एन-७ परिसरातील एपी किड्स वर्ल्ड स्कूल येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण, कौशल्यविकास, व्याजपरतावा अशा विविध रोजगाराभिमुख योजनांची सविस्तर माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली. योजनांचा लाभ कोण घेऊ शकतो, अर्जप्रक्रिया कशी आहे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती, याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृतमित्र रामेश्वर साळुंके व अमृतसखी रुचा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी अक्षय लंबे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देऊन उपस्थित नागरिकांच्या शंकांचे समाधान केले. अमृत संस्थेच्या योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबनाची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीला आद्य गौड समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर शर्मा, सुनील सुरोलिया, लक्ष्मीकांत शर्मा यांच्यासह स्वर्गीय शंकरलाल बुटेले सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. नीता प्रशांत बुटेले, उपाध्यक्ष नंदकुमार जोशी, कोषाध्यक्ष विजय सोनटक्के, तसेच सहकारी दत्ता शिनगारे व गणपत पवार हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संचालक प्रशांत पांडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांना अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. या बैठकीमुळे परिसरातील लक्ष्यित गटातील नागरिकांना अमृतच्या योजनांची थेट माहिती मिळाली असून, अधिकाधिक गरजू नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment