वेगळे काही तरी करून आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल टाकण्याची इच्छा निःशुल्क प्रशिक्षणामुळे उतरली सत्यात
सातारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्यासाठी संस्थेतर्फे विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाचाही समावेश आहे. साताऱ्यातील आशिष आचार्य या एका महत्त्वाकांक्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याचा लाभ घेऊन वेगळे काही तरी करण्याची इच्छा पूर्ण केली.
आपल्या आयुष्यात काही तरी वेगळे आणि नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा आणि जिद्द आशिषच्या मनात होती. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या आशिषला ड्रोन पायलट व्हायचे होते. त्याला अमृत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दलची माहिती सोशल मीडियातून मिळाली. त्याने त्वरित अमृत संस्थेच्या सातारा जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली आणि प्रशिक्षणासाठी आपली नावनोंदणी केली.
आशिषने पुण्यात ड्रोन पायलट व्हिडिओग्राफीचे विशेष प्रशिक्षण घेतले. अमृत संस्थेच्या पाठबळामुळे आशिष आज उत्पन्न मिळवण्यास सक्षम झाला आहे. केवळ शिक्षणच नाही, तर आपल्या पायावर उभे राहण्याची एक सुवर्णसंधी त्याला या माध्यमातून मिळाली. आशिष आता व्यावसायिक स्तरावर काम करण्यास पात्र झाला आहे. सध्या कामाचा अनुभव घेऊन भविष्यात स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.
या अनुभवाबद्दल सांगताना आशिष म्हणाला, 'मी हे १० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचे प्रशिक्षक अतिशय अनुभवी होते आणि निवासाची व प्रशिक्षणाची व्यवस्था उत्तम होती. या प्रशिक्षणामुळे मला ड्रोन तंत्रज्ञानातील बारकावे शिकायला मिळाले. मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो. माझ्यासारख्या तरुणांना दिशा देण्याचे काम ही संस्था उत्तमरीत्या करत आहे.'
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment