हिंगोलीतील श्रद्धा जोशी यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पूर्ण केला ड्रोन पायलट कोर्स
हिंगोली : महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आजच्या जगात सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत; मात्र तरीही महिलांचे करिअर म्हटले, की ठरावीक पर्यायांचाच विचार समाजाकडून केला जातो. आपण जे मनापासून ठरवू, ते जिद्दीने पूर्ण करू असा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासावर श्रद्धा असली, तर महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. याचेच एक उदाहरण हिंगोलीतील श्रद्धा जोशी यांनी घालून दिले आहे. अमृत संस्थेचा ड्रोन पायलट कोर्स त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, त्यांचे हे यश सर्वांसाठीच प्रेरक ठरले आहे.
अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्येच ड्रोन पायलट कोर्सचा समावेश आहे. या ड्रोन पायलट कोर्ससाठी हिंगोलीतील श्रद्धा जोशी यांनीही प्रवेश घेतला होता. तो कोर्स त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्याचे अधिकृत प्रमाणपत्रही त्यांना प्रदान करण्यात आले. या कौशल्याच्या आधारे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यांच्या तुकडीमध्ये प्रवेश घेणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या, हे विशेष.
त्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला असून, जिद्द आणि मेहनतीचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. ड्रोन प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर श्रद्धा जोशी यांनी अमृत संस्थेच्या हिंगोली जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी प्रशिक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत मिळालेले मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून अमृत संस्थेचे त्यांनी आभार मानले.
अमृत संस्थेच्या माध्यमातून महिलांना आधुनिक व नावीन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याचाच सकारात्मक परिणाम श्रद्धा जोशी यांच्या यशातून दिसून येतो. ड्रोन तंत्रज्ञानासारख्या आधुनिक व तांत्रिक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा, यासाठी श्रद्धा जोशी यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे. महिलांनी केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आत्मविश्वासाने वाटचाल करावी, हा संदेश या यशातून मिळत असून, इतर महिलांसाठी श्रद्धा जोशी यांचे हे यश आदर्श ठरणार आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment