अमृत संस्थेने आयोजित केलेल्या बैठकीला चांगला प्रतिसाद
गोंदिया : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सिंधी समाजासाठी अमृत संस्थेने बैठक आयोजित केली होती. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात असलेल्या सिंधी समाजातील तरुण आणि नवउद्योजकांच्या या बैठकीला चांगला प्रतिसाद लाभला. अंकित चट्टानी, प्रकाश ज्ञानचंदानी, नरेश बेलनी, अनिल मेहरचादानी यांच्यासह सिंधी समाजबांधव उपस्थित होते.
तिरोडा तालुक्यातील लघु उद्योजक सुनील जोशी यांनी या वेळी आपल्या उद्योजकीय अनुभवातून तरुणांना मार्गदर्शन केले. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी यांनी सांगितले, की 'आजच्या बैठकीतून तरुणांच्या मनात निर्माण झालेले उद्योजकतेचे स्वप्न अमृत संस्था निश्चितपणे साकार करील.' अमृत संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना नवउद्योजकांसाठी संजीवनी ठरत असून, आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठा आधार देणारी योजना असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीमुळे तिरोडा तालुक्यातील तरुणांमध्ये उद्योग, स्वयंरोजगार व उद्योजकतेबाबत नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यात अधिकाधिक तरुण अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी...
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. या जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment