व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळण्याचे निश्चित झाल्यावर कोल्हापूरच्या अभिजित कुलकर्णींनी व्यक्त केली भावना
कोल्हापूर : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे व्यावसायिकांसाठी कर्ज व्याजपरतावा योजना राबवण्यात येते. कोल्हापुरात डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रात कार्यरत असलेले व्यावसायिक अभिजित अशोक कुलकर्णी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याबद्दलचे मंजुरीपत्र (लेटर ऑफ इंटेंट) त्यांना मिळाले आहे. 'अमृत ही संस्था नावाप्रमाणेच अमृत आहे, योजनेचा लाभ मिळणार असल्याची खात्री झाल्यानंतर माझा अमृत या संस्थेवरचा विश्वास अधिकच दृढ झाला,' अशा शब्दांत कुलकर्णी यांनी अमृत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोनानंतरच्या काळात अभिजित कुलकर्णी घरातूनच आपला डिजिटल प्रिंटिंगचा व्यवसाय करत आहेत. व्यवसायासाठी स्वतंत्र वर्कशॉप सुरू करण्याची त्यांची इच्छा होती; मात्र विविध कारणांमुळे ते शक्य होत नव्हते. अमृत संस्थेच्या जिल्हा मेळाव्यातून त्यांना व्याजपरतावा योजनेची माहिती मिळाली. या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी योजनेची संपूर्ण माहिती दिली, तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कुलकर्णी यांनी लगेच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ती अमृत संस्थेच्या वेबसाइटवर जमा केली. कागदपत्रे सादर केल्यानंतर अल्पावधीतच अमृत संस्थेचे लेटर ऑफ इंटेंट त्यांना मिळाले.
या योजनेमुळे व्यवसायासाठी स्वतंत्र वर्कशॉप सुरू करण्यासाठी त्यांना नवी आशा निर्माण झाली, त्यांचा आत्मविश्वासही वाढला. त्यातून त्यांनी व्यवसायवृद्धीसाठी कर्ज घेऊन नवीन मशीन घेतले. त्या कर्जावर त्यांनी अमृतच्या व्याजपरतावा योजनेचा लाभ घेण्याचे त्यांनी ठरवले. वर्कशॉपसाठीची स्वतंत्र जागा शोधून, पायाभूत सुविधा उभारून अद्ययावत वर्कशॉप सुरू केले. अमृत संस्थेमुळे त्यांच्या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे.
भविष्यात व्यवसाय वाढवून स्वतःसारख्या नवउद्योजकांसाठी आदर्श निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. अमृत या संस्थेला उद्योजक घडवण्यासाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारा फलक आपल्या वर्कशॉपबाहेर लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृत संस्थेचे संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment