नायगावमध्ये अमृत संस्थेतर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

नायगावमध्ये अमृत संस्थेतर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा मुख्य फोटो
नायगावमध्ये अमृत संस्थेतर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा अतिरिक्त फोटो

नायगाव (जि. नांदेड) : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी 'राष्ट्रीय युवा दिन' या विषयावर आपले विचार मांडले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयएमसी सदस्य आणि अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे आयएमसी सदस्य लक्ष्मण बुद्धलवाड आणि प्रमुख वक्ते म्हणून नायगावमधील मिलेनियम पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर जोशी उपस्थित होते. संस्थेच्या वीजतंत्री आणि जोडणी विभागाचे निदेशक श्री. जाधव आणि श्री. निंबाळकर, तसेच अन्य सर्व निदेशक आणि प्रशिक्षणार्थी या वेळी उपस्थित होते.

डॉ. ज्ञानेश्वर जोशी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर ओघवत्या वाणीतून प्रकाश टाकला. त्यांच्या बालजीवनापासून शिकागोमधील त्यांच्या विश्वविक्रमी भाषणापर्यंतच्या सर्व मुद्द्यांचा त्यात समावेश होता. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडवले, स्वराज्याच्या संकल्पनेची बीजे त्यांनी कशी रोवली व आपल्या संस्कारांची, विद्येची, शौर्याची, धैर्याची शिकवण देऊन महाप्रतापी पुत्र भारतमातेला कसा दिला, यावरही त्यांनी भाष्य केले.

आजच्या युवा पिढीने स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा, असे विश्वेश्वर जोशी यांनी सांगितले. युवकांनी समता, बंधुता, समरसता, तत्परता, ध्येयनिष्ठता या मूल्यांचा पुरस्कार करून आत्मविश्वासाने कार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून भारत आत्मनिर्भर आणि विश्वगुरू होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सादही त्यांनी घातली.

आभारप्रदर्शन श्री. जाधव यांनी, तर सूत्रसंचालन श्री. निंबाळकर यांनी केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 03:15 PM News publication time | Views: 187 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Vishweshwar Joshi News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 03:15 PM News publication time | Views: 187 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words