पहिली तुकडी घेतेय प्रशिक्षण
नाशिक : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या राज्य शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेने नाशिकमध्ये ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण कोर्स सुरू केला आहे. अमृत कौशल्यविकास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कोर्सच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पाच जानेवारीपासून सुरू झाले आहे. नाशिकमधील कॉलेज रोडवरील ड्रोन कॉर्पोरेशनमध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे.
आजच्या डिजिटल युगात तरुणाईने आपल्या तांत्रिक कलागुणांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाव मिळवून द्यावा आणि या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधींची कवाडे खुली करावीत, हे ड्रोन प्रशिक्षणाच्या आयोजनामागील मुख्य उद्दिष्ट आहे. या कोर्समध्ये ड्रोनची मूलभूत माहिती, ड्रोनचे विविध क्षेत्रांत होणारे उपयोग, तांत्रिक ज्ञान या सगळ्याचे सविस्तर आणि प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासोबतच लाभार्थ्यांना ड्रोनच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शनदेखील आयोजक करीत आहेत. या प्रशिक्षणासाठी राहुल बोराडे हे अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देत आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment