त्यांना देण्यात आली अमृत दिनदर्शिकेची भेट
रत्नागिरी : रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचा समारोप ११ जानेवारी रोजी झाला. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांनी या महोत्सवात महाभारतातील कृष्णशिष्टाईपासून युद्धापर्यंतचा काळ आपल्या रसाळ वाणीतून उभा केला. सहा दिवसांच्या या महोत्सवाला दररोज सुमारे साडेचार ते पाच हजार श्रोत्यांची उपस्थिती होती. या महोत्सवाच्या समारोपावेळी अमृत संस्थेचे रत्नागिरी जिल्हा उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये यांनी आफळेबुवांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेची दिनदर्शिका भेट दिली. इंग्रजी तारखांबरोबरच हिंदू पंचांगाचाही या दिनदर्शिकेत समावेश असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. अमृत संस्थेच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती असून, आपण संस्थेच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात जाऊन आल्याचे आफळेबुवांनी आवर्जून नमूद केले. या वेळी अमृत संस्थेची माहिती देणारे टिपण निवेदन स्वरूपात श्रोत्यांसमोर वाचून दाखवण्यात आले. या वेळी कीर्तनसंध्या परिवारातील सदस्यांनाही अमृत दिनदर्शिका भेट देण्यात आली.
२०२५च्या जानेवारी महिन्यात अमृत किशोर विकास उपक्रमांतर्गत युवतींसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर म्हणजे खरे समुद्रमंथन असून, समाजात चांगले विचार रुजवायचे असतील तर अशी शिबिर महत्त्वाची आहेत, असे गौरवोद्गार आफळेबुवांनी त्या वेळी काढले होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment