अमृत संस्थेच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या प्रशिक्षणासाठी हिंगोलीत नावनोंदणी सुरू
हिंगोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महिला, तसेच स्थानिक उत्पादकांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून अमृत संस्थेच्या हिंगोली जिल्हा कार्यालयाने याबाबत एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर भर असून, इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन अमृत कार्यालयाने केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिलांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, उत्पादन अपलोड करणे, किंमत निश्चिती, ग्राहकांशी संपर्क, डिजिटल विक्रीची संकल्पना, तसेच अमृतपेठ या प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयात होणार आहे.
महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांना ऑनलाइन विक्रीचे कौशल्य शिकवणे आणि त्यातून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मकर संक्रांतीनिमित्त राबविण्यात येणारा हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील बचत गट सदस्य, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या आणि उद्योजक महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत हिंगोली जिल्हा कार्यालयाने केले आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क :
श्रीकांत धोतरे - 73910 65471
हिंगोली जिल्हा व्यवस्थापक, अमृत
ई-मेल : amrut.hingoli.dm@gmail.com
पत्ता :
अमृत हिंगोली जिल्हा कार्यालय,
प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला,
चाइल्ड हेल्पलाइन कार्यालयामध्ये,
हिंगोली – 431513
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment