अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे आवाहन
पुणे : 'अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. ज्यांना अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, असे सामाजिक घटक या संस्थेच्या लक्ष्यित गटात असून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रशिक्षणापासून अर्थसाह्यापर्यंत विविध योजना 'अमृत'तर्फे राबवल्या जातात. जास्तीत जास्त युवक आणि महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. व्यावसायिक प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि अमृत संस्था सर्वतोपरी सहकार्य करत आहे,' असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले.
ब्राह्मण ऑर्गनायझेशन फॉर नेटिव्ह डेव्हलपमेंट अर्थात बाँड या संघटनेच्या वतीने निगडी येथील पाटीदार भवनमध्ये इंडस्ट्रियल एक्झिबिशन उत्साहात पार पडले. या वेळी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘बाँड’च्या संस्थापिका उत्कर्षा कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
या वेळी विजय जोशी यांनी अमृत संस्थेची माहिती, योजना व सर्व उपक्रम सविस्तरपणे मांडले. अमृतच्या लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त युवक आणि महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी यावेळी दिला. व्यावसायिक प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि अमृत संस्था सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उत्कर्षा कुलकर्णी यांनी ‘बाँड’ संघटनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. उपस्थितांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. या कार्यक्रमाला सुमारे १५० जण उपस्थित होते. त्यात तरुण आणि महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. या प्रदर्शनामुळे स्थानिक उद्योजकांना आपले कौशल्य आणि उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या वेळी ‘बाँड’ संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment