हिंगोलीच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला विश्वास
हिंगोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने प्रकाशित केलेली अमृत दिनदर्शिका हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला देण्यात आली. अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम व विकासाभिमुख कार्यक्रमांची सविस्तर माहितीही या वेळी देण्यात आली. अमृत दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती ठळक स्वरूपात मांडण्यात आल्यामुळे योजनांचा प्रचार व प्रसार अधिक परिणामकारकरीत्या होईल, असा विश्वास जिल्हा माहिती कार्यालयाने व्यक्त केला.
अमृत संस्थेच्या योजना आणि उपक्रमांची माहिती माध्यमे व प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असून, अमृत दिनदर्शिकेमुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे अमृत संस्था आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन शासनाच्या योजना तळागाळातील घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणार आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment