दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाली चर्चा
नांदेड : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ लक्ष्यित घटकांना अधिक चांगल्या प्रकारे देण्यासाठी नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (एनएमसी) अमृत संस्थेला सहकार्य करणार आहे. या बँकेच्या अधिकाऱ्यांनी अमृत संस्थेच्या नांदेड जिल्हा कार्यालयाला नुकतीच भेट दिली.
बँकेचे सीईओ श्री. बनवस्कर, कर्ज विभागप्रमुख श्री. कोडगिरे आणि वजिराबाद शाखेचे व्यवस्थापक श्री. सिंधू यांचा त्यात समावेश होता. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेच्या लाभार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे लाभ कसा देता येईल, यावर सखोल चर्चा झाली. सर्व मान्यवरांना अमृत संस्थेची दिनदर्शिका देण्यात आली. योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असल्याची भावना या वेळी व्यक्त झाली.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा कार्यालय - 7391065472
संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृत संस्थेचे संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment