लक्ष्यित गटासाठी निःशुल्क प्रशिक्षण
जिंतूर (जि. परभणी) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिंतूर येथे फॅशन डिझायनिंग अँड ड्रेस मेकिंग प्रशिक्षणाचा चार जानेवारी २०२६ रोजी प्रारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण चार जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कसबा पेठेतील भाग्यवंत गारमेंट होणार आहे. महिलांना व तरुणींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. 'महिलांनी व तरुणींनी मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा. तसेच यशस्वी उद्योजिका होऊन स्वावलंबी बनावे व प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा,' असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले.
यावेळी एमसीईडीचे परभणी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, श्री संचारेश्वर विद्यालयाचे कार्यवाह रविकुमार पेशकार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी महिलांना फॅब्रिकची ओळख, मानवी आकृती ड्रॉइंग, शरीराचे मोजमाप घेण्याची पद्धत, कपड्यांचे कटिंग तंत्र, रंगसंगती, स्केचिंग, शिवणकाम, अॅक्सेसरीज डिझायनिंग यांसारखी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत परभणी जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.
मोबाइल : 7391065473
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment