अंमलबजावणीसाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही
अमरावती : अचलपूर तालुक्याचे तहसीलदार बळवंत अशोकराव यांना महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेची दिनदर्शिका वितरित करण्यात आली. या प्रसंगी तहसीलदार श्री. अशोकराव यांना अमृत संस्थेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती, तसेच अमृत संस्था कशा प्रकारे कार्य करते याची थोडक्यात माहिती देण्यात आली. यासोबतच अमृत संस्थेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार निर्मितीचे उपक्रम, तसेच लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.
अमृत संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील युवक, महिला व गरजू घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचे तहसीलदारांनी कौतुक केले. अशा उपक्रमांना प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भेटीमुळे अमृत व प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन भविष्यातील उपक्रमांना चालना मिळणार आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment