प्रसिद्ध उद्योजक अजित बेडेकर यांचे आवाहन; देवगड तालुका ब्राह्मण संमेलनात अमृत योजनांचा जागर
देवगड (जि. सिंधुदुर्ग) : 'अमृत संस्थेच्या योजनांचा नवउद्योजकांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे,' असे आवाहन मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक अजित बेडेकर यांनी केले. देवगड तालुका ब्राह्मण मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. त्यामध्ये व्यावसायिक मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या संमेलनात अमृत संस्थेच्या योजनांच्या माहितीचा जागर झाला.
वैदिक ईशस्तवन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्योजक निरंजन दीक्षित यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या संमेलनामध्ये अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांना बोलावण्यात आले होते. केळकर यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये अमृत संस्थेच्या शैक्षणिक योजना, तसेच अमृत बेकरी प्रशिक्षण, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण, अमृत आयात-निर्यात प्रशिक्षण, तसेच अमृत कौशल्यविकास उपक्रमांतर्गत होणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम यांची माहिती देण्यात आली.
अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मविषयीदेखील माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि व्ही. पी. बेडेकर अँड सन्स कंपनीचे संचालक अजित बेडेकर उपस्थित होते. त्यांनी व्यावसायिक मार्गदर्शनही केले. अमृत संस्थेच्या योजनांचा नवउद्योजकांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर यांनी संतसाहित्यावर विचार मांडले. उपस्थित मान्यवरांना अमृत दिनदर्शिका देण्यात आली
राष्ट्रगीत आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला ३००हून अधिक जण उपस्थित होते. यामुळे अमृत संस्थेच्या कामाला नक्कीच उभारी मिळेल, असा विश्वास जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांनी व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्रीराम केळकर
सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक, अमृत
9112228760, 8554059044
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment