खामगावमध्ये ब्राह्मण महिलांनी केले अमृत संस्थेच्या उपक्रमांचे स्वागत
खामगाव (जि. बुलढाणा) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खामगाव येथील ब्राह्मण सभा हॉलमध्ये महिलांसाठी विशेष मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या वेळी अमृत बेकरी, अॅडव्हान्स ब्युटी पार्लर, फॅशन डिझाइन, क्लाउड किचन, तसेच आर्टिफिशियल ज्वेलरी निर्मिती यांसारख्या विषयांवरील प्रशिक्षण लवकरच राबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या प्रशिक्षणांमुळे महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होणार आहे.
या बैठकीत उपस्थित महिलांना अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी मार्गदर्शन केले. “महिलांनी या प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. संधी स्वतःकडे चालून आली आहे, आता पुढे येऊन तिचा उपयोग करण्याची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी केले. महिलांनी स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
या बैठकीला ब्राह्मण समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व महिलांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून भविष्यात अशा अधिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक सकारात्मक व प्रेरणादायी पाऊल ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment