मान्यवरांकडून स्वागत
रत्नागिरी : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या स्वायत्त संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी तयार केलेल्या विशेष दिनदर्शिकेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वितरणाची सुरुवात करण्यात आली. अमृत संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात झालेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात लांजा येथील प्रसिद्ध केटरर व अमृत संस्थेचे लाभार्थी मनोज ठाकूरदेसाई यांना दिनदर्शिका देण्यात आली. या वेळी अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, जिल्हा उपव्यवस्थापक अवधूत मुळये, 'अमृत महाराष्ट्र'चे प्रमुख महेश गर्दे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे, तसेच कार्यक्रम समन्वयक धनश्री खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमृतच्या या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सुरुवात जानेवारी २०२६मध्ये होते आणि ती थेट एप्रिल २०२७पर्यंत आहे. हिंदू संस्कृतीचा सन्मान राखून या दिनदर्शिकेमध्ये हिंदू वर्ष, महिने, तसेच तिथींचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. या दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व लाभार्थ्यांसाठी उपयुक्त माहितीचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे ही दिनदर्शिका केवळ तारीख दर्शवणारे साधन न राहता माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक ठरत आहे.
मराठी परंपरा, पंचांग पद्धती आणि आधुनिक गरजांचा समन्वय साधणारी ही दिनदर्शिका अमृत संस्थेच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांना पूरक असून, लाभार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 1 Comments
SANKET SURYAKANT SATHE
nice
Write a Comment