निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी यांना उपक्रमाची माहिती; आश्रमशाळा व वसतिगृहांपर्यंत उपक्रम पोहोचविण्यासाठी सहकार्याचे आश्वासन
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी यांची भेट घेऊन त्यांना उपक्रमासंदर्भातील पत्र देण्यात आले. यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. योगेश अहिरे यांनी उपक्रमाची संकल्पना व उद्दिष्टे यांची सविस्तर माहिती दिली.
जागतिक दर्जा प्राप्त १२ शिवदुर्ग पैकी कुठल्याही एक किव्हा अधिक किल्यांची प्रतिकृती तयार करून त्यांच्यासोबत सेल्फी छायाचित्र काढणे आणि ते https://www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. सहभागी व्यक्तींना या प्रक्रियेनंतर त्यांच्या ई-मेलवर अमृत संस्थेमार्फत ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची ओळख अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमाची माहिती जाणून घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी आपल्या स्तरावरून पत्र पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक श्री. योगेश अहिरे यांनी श्रीमती आशा संघवी यांचे आभार मानले. तसेच, या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा कार्यालयाकडून निश्चितच सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा गौरव करण्यासाठी अमृत संस्था प्रयत्नशील आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment