लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची अमृत दुर्गोत्सव उपक्रमाबाबत सकारात्मक चर्चा झाली
लातूर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत दुर्गोत्सव’ या उपक्रमाच्या अनुषंगाने लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपक्रमाच्या उद्देशाबाबत सविस्तर माहिती देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास तसेच गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी गड-किल्ल्यांना भेटी देऊन इतिहास जाणून घ्यावा, लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करावे आणि ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमानाची भावना जोपासावी, या दृष्टीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमाची माहिती जाणून घेतल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांच्याशी शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव, सांस्कृतिक मूल्ये आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेविषयी आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘अमृत दुर्गोत्सव’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाशी जोडून सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी प्रेरित करण्याचा अमृत संस्थेचा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध शैक्षणिक संस्था व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment