अमृत पेठ थेट बाजारपेठेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३० स्टॉलमधून ८१ हजार रुपयांची उलाढाल होऊन स्थानिक उद्योजकांना मिळाली नवी बाजारपेठ
स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाला अकोला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी महालक्ष्मी द्वार, रिंग रोड, कौलखेड, अकोला येथे दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत या बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात एकूण ३० स्टॉल सहभागी झाले असून, त्यातून सुमारे ८१ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
या बाजारपेठेत नवरात्रीसाठी लागणारे साहित्य, आकर्षक ज्वेलरी, हस्तनिर्मित वस्तू, पूजासाहित्य, विविध प्रकारच्या बॅग, खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने आणि गृहपयोगी वस्तूंची विक्री करण्यात आली. विविध प्रकारची उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेला भेट देत खरेदीला चांगला प्रतिसाद दिला.
या उपक्रमामुळे महिला उद्योजक, लघुउद्योजक आणि गृहउद्योग चालविणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळाली. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता आल्याने स्टॉलधारकांना व्यवसायवृद्धीसाठी प्रोत्साहन मिळाले. झालेल्या विक्रीमुळे स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केले.
विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर अकोला शहरातील इतर भागांमध्येही ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ भरविण्यात यावी, अशी विचारणा स्टॉलधारकांकडून करण्यात आली. यामुळे या उपक्रमाची उपयुक्तता अधोरेखित झाली आहे.
स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटातील उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हा अमृत संस्थेच्या या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ३० स्टॉलधारकांचा सहभाग आणि ८१ हजार रुपयांची उलाढाल यामुळे ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ हा उपक्रम स्थानिक उद्योजकांसाठी आशादायी ठरला आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment