बाळापूरमधील प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा व्यवस्थापकांची भेट
अकोला : राज्य शासनाची अमृत ही स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. या भेटीमध्ये त्यांनी प्रशिक्षण केंद्राची माहिती घेऊन प्रशिक्षणार्थी महिलांशी सविस्तर संवाद साधला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे हा आहे. ब्युटी पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक व व्यावहारिक ज्ञान या प्रशिक्षणात दिले जात आहे.
या वेळी श्री. कुलकर्णी यांनी महिलांना वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळत असल्याने आर्थिक भार कमी होतो व व्यवसायवृद्धीस चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व महिलांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत असून, अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सकारात्मक असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.
या कार्यक्रमामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महिलांची वाटचाल सुरू झाली आहे. अमृत व एमसीईडी यांचे हे संयुक्त उपक्रम महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही नमूद करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment