मेहरबानू कॉलेज, अकोला येथे अमृत संस्थेचा उपक्रम; प्रशिक्षित विद्यार्थी विविध शाळांमध्ये अमृत वर्ग घेणार
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शाळांमध्ये अमृत वर्गांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासोबतच अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत विकासाभिमुख उपक्रम पोहोचविण्याच्या उद्देशाने अकोला येथील मेहरबानू कॉलेजमध्ये ‘ट्रेन टू टीचर’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कॉलेजमधील ४८ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री. कैलास कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अमृत वर्गांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक तसेच व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेत, विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा आणि विविध विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे कसे घ्यावेत, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणानंतर सहभागी विद्यार्थी विविध शाळांमध्ये जाऊन अमृत वर्ग घेणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची संधी मिळण्यासोबतच नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि अध्यापनाचा अनुभवही प्राप्त होणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहरबानू कॉलेजचे देशपांडे सर तसेच प्राचार्य स्मिता शिंगरूप यांनी सहकार्य केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रशिक्षक श्री. कैलास कुरकुटे, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. योगेश जोशी, उपव्यवस्थापक श्री. गणेश मुळे, श्री. ओंकार हरदास आणि श्री. वेदांत मेहता उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपानंतर अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमृत वर्गांमागील संस्थेची भूमिका, या उपक्रमाचा व्यापक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी हे कार्य जबाबदारीने व प्रभावीपणे पार पाडावे, असे आवाहन करून सर्व प्रशिक्षणार्थींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम अमृत संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला नवी दिशा देणारा ठरत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment