श्री शिवयोगी: सिद्धलिंग मन्मथ स्वामी महाराज यांनी अमृतच्या लातूर जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विकास योजनांची माहिती जाणून घेतली.
लातूर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या लातूर येथील कार्यालयास शिवयोगी सिद्धलिंग मन्मथ स्वामी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी अमृतच्या माध्यमातून विविध समाजघटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, प्रशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. युवक-युवतींना स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास, व्यवसाय व उद्योजकतेच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी अमृतकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच अमृतच्या माध्यमातून समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना व उपक्रम पोहोचविणे, युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबतही चर्चा करण्यात आली.
श्री शिवयोगी: सिद्धलिंग मन्मथ स्वामी महाराज यांनी अमृतच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. समाजातील युवक व गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून, त्याचा अधिकाधिक लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक अजय कुलकर्णी तसेच अमृत मित्र अमित पांडे उपस्थित होते. अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती समाजातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अमृतच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment