छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेच्या वितरणानंतर मान्यवरांची प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेने आपल्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी खास दिनदर्शिका तयार केली आहे. योजनांची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून देणारी अमृत ही राज्यातील पहिली शासकीय संस्था ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अमृत संस्थेच्या वतीने ही दिनदर्शिका मान्यवर अधिकाऱ्यांना देण्यात आली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर, महसूल नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे, तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक श्री. दीपक राठोड यांना दिनदर्शिका सुपुर्द करण्यात आली.
अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ही दिनदर्शिका दिली. सर्व अधिकाऱ्यांनी दिनदर्शिका पाहून अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्व योजनांची माहिती एका दिनदर्शिकेवर देण्याची संकल्पना अभिनव असल्याचे मत व्यक्त केले.
ही अमृत दिनदर्शिका संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारली असून, सध्या संपूर्ण राज्यात तिचे वितरण सुरू आहे. या दिनदर्शिकेमुळे सामान्य नागरिकांना अमृतच्या योजना समजून घेणे अधिक सोपे होणार असून, योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्कर रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 3 Comments
RAVINDRA CHOBE
its very good thing that amrut has growing very well learning from you with lots of unemployed public . organising different types of skilled education training and much more thanks for your attention
mahesh garde
खूप छान ..
SANKET SURYAKANT SATHE
Great ..!!!
Write a Comment