महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि नवयुग नशामुक्ती केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे ‘अमृत संस्थेच्या योजना व नशामुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
नशामुक्त भारताचा संदेश अन् अमृतच्या योजनांची माहिती; इंदिरा गांधी महाविद्यालयात मार्गदर्शन जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि नवयुग नशामुक्ती केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे ‘अमृत संस्थेच्या योजना व नशामुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक, कौशल्यविकास व रोजगारक्षम योजनांची माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत शिक्षणासोबत कौशल्यविकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन केले. अमृत संस्थेमार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व व्यावसायिक उपक्रमांचा लाभ घेऊन स्वतःच्या कौशल्याला योग्य दिशा द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी नवयुग नशामुक्ती केंद्राचे समुपदेशक श्री. संजय थोरात यांनी ‘नशामुक्त भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नशेच्या आहारी गेल्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, शिक्षणावर, कुटुंबावर तसेच सामाजिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती त्यांनी दिली. तरुणांनी नशेपासून दूर राहून निरोगी, सकारात्मक आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी, तसेच आपल्या मित्र-परिवारामध्येही नशामुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची, व्यक्तिमत्त्वाची आणि भविष्यातील करिअरची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विठ्ठल गाडेकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करून अमृत संस्था व नवयुग नशामुक्ती केंद्राच्या संयुक्त उपक्रमाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोवर्धन खेडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दादासाहेब गिऱ्हे यांनी केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर शिक्षण, कौशल्यविकास, व्यावसायिक संधी, उद्योजकता आणि नशामुक्त जीवनशैली याबाबत मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेत आपल्या कौशल्याला रोजगार व उद्योजकतेची दिशा देतानाच नशामुक्त आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment