धारणी तालुक्यात अमृतच्या दस्तऐवजीकरण व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोट येथे विविध गावांतील नागरिकांचा सहभाग; शासकीय कागदपत्रांसह राजपूत समाजाच्या ऐतिहासिक वारशाची घेतली माहिती

धारणी तालुक्यात अमृतच्या दस्तऐवजीकरण व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
धारणी तालुक्यात अमृतच्या दस्तऐवजीकरण व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

धारणी, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत सेवा संकल्प अभियानांतर्गत धारणी तालुक्यातील कोट येथे दस्तऐवजीकरण व शासकीय सेवा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला कोटसह परिसरातील तीन ते चार गावांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शिबिरादरम्यान नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक शासकीय दस्तऐवज तयार करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहाय्य करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या शिबिरादरम्यान कोट गावातील ऐतिहासिक किल्ला, मंदिर तसेच राजपूत समाज भवन (१९९८) यांचीही माहिती घेण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कोट परिसराचा ऐतिहासिक वारसा, राजपूत समाजाची परंपरा, सामाजिक योगदान आणि स्थानिक इतिहास याबाबत अमृतच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी गरीब्याजी शनवारे (समाजसेवक), ईश्वरसिंग चव्हाण (CDO – जीवन प्रोजेक्ट, कोठारा), करणी सेना जिल्हाध्यक्ष महेंद्रसिंह राजपूत (मेलघाट) तसेच राजपूत समाजातील नागरिक उपस्थित होते. मान्यवरांनी कोट परिसरातील ऐतिहासिक व सामाजिक महत्त्वाच्या बाबींची माहिती देत स्थानिक इतिहास आणि सामाजिक वारसा जतन करण्याच्या गरजेवरही प्रकाश टाकला. शिबिरास अमृतचे अमरावती विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर, अमरावती जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर तसेच अमृत मित्र मिराज अग्रहरी यांची उपस्थिती होती. अमृतच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना, कागदपत्रे व मार्गदर्शन पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दस्तऐवजीकरणाच्या सुविधेसोबतच स्थानिक समाजाचा इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची संधी मिळाल्याने हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 03:52 PM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 03:52 PM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement