अमृत शासन सेतू संवाद उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीची माहिती

धारणी पोलीस स्टेशनमध्ये कायदे, सायबर गुन्हे आणि पोलीस विभागाच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन.

अमृत शासन सेतू संवाद उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीची माहिती  मुख्य फोटो
अमृत शासन सेतू संवाद उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीची माहिती  अतिरिक्त फोटो

धारणी, दि. ३० सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), जिल्हा कार्यालय अमरावती यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत शासन सेतू संवाद’ या उपक्रमांतर्गत धारणी पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्री वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी येथील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची कार्यप्रणाली प्रत्यक्ष समजून घेता यावी, तसेच त्यांच्यामध्ये कायदेविषयक आणि सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमासाठी अमृत, जिल्हा कार्यालय अमरावतीचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश कथलकर आणि अमृत मित्र श्री. केदार चावरकर उपस्थित होते. तसेच श्री वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी येथील डॉ. आर. एस. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, हे विद्यार्थ्यांसह कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी धारणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. संदीप पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. विशाल राठोड यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या विविध विभागांची आणि कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली. पोलीस स्टेशनमधील महिला कक्ष, समुपदेशन कक्ष तसेच इतर विविध कक्षांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना या विभागांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांच्या कामकाजाची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमादरम्यान विविध कायदे, गुन्ह्यांचे स्वरूप, गुन्ह्यांची नोंदणी, तपास प्रक्रिया आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः सध्याच्या डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि सायबर सुरक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहावे आणि अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहारांबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. शासन आणि विद्यार्थ्यांमधील संवादाचा प्रभावी दुवा ‘अमृत शासन सेतू संवाद’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाचे प्रत्यक्ष कामकाज जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली. शासकीय यंत्रणेची माहिती केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. पोलीस प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट संवाद घडून आल्याने कायदेविषयक जागरूकता वाढण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमृत संस्थेचे आभार मानले. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. एस. पाटील यांनीही अमृत संस्था आणि पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले. अमृतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागांच्या कार्यप्रणालीची माहिती करून देणे, त्यांच्यामध्ये सामाजिक व कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे आणि शासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, या व्यापक उद्देशाने ‘अमृत शासन सेतू संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धारणी येथे आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Rushikesh Harish Kathalkar News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 05:00 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Harish Kathalkar News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 05:00 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement