वृक्षारोपण आणि निसर्गसंवर्धन ही काळाची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी झाडे लावून त्यांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला
बदलते हवामान, वाढते तापमान आणि पर्यावरणाचा ढासळणारा समतोल लक्षात घेता निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. याच उद्देशाने काल, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या वतीने राजनगर, काटोल रोड येथील बाल विकास विद्यार्थी वसतिगृह परिसरात उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला बालविकास कल्याण अधिकारी, पर्यवेक्षण अधिकारी तसेच 'अमृत'चे जिल्हा व्यवस्थापक व उपव्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वसतिगृह परिसरात विविध प्रकारच्या उपयुक्त रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, "आजच्या आधुनिक युगात वृक्षारोपण केवळ एक औपचारिकता न राहता पृथ्वीच्या अस्तित्वासाठी आवश्यक बनले आहे. झाडे केवळ आपल्याला ऑक्सिजन आणि सावली देत नाहीत, तर भूजल पातळी वाढवणे, हवा शुद्ध ठेवणे आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच निसर्गाशी नाळ जोडून केवळ झाडे लावू नयेत, तर त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी." कार्यक्रमात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत प्रत्यक्ष वृक्षारोपण केले आणि लावलेल्या झाडांचे नियमित जतन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment