महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत शासन संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत लोकमान्य ज्युनिअर कॉलेज, भद्रावती येथील विद्यार्थ्यांनी नगरपरिषद भद्रावती येथे भेट देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती जाणून घेतली.
या उपक्रमादरम्यान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नगरपरिषदेची प्रशासकीय रचना, विविध विभागांची कार्यपद्धती, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा आणि शहराच्या सर्वांगीण विकासात नगरपरिषदेची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपमुख्याधिकारी विजय कुमार जांभूळकर यांनी नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणारे विविध विकासात्मक उपक्रम, नागरिकांच्या दैनंदिन कामांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया आणि विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्याची पद्धत याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी अमृतचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक आदित्य सेंगर यांनीही या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची ओळख करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. लोकमान्य ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. स्वाती गुंडावर आणि प्रा. नितीन लांजेवार यांचीही यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीविषयी विविध प्रश्न विचारून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत प्रशासकीय कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
‘अमृत शासन संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रशासनाची कार्यपद्धती समजावून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेची रचना, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, विविध विभागांच्या जबाबदाऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळत आहे. भद्रावती नगरपरिषदेच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment