वर्धा जिल्ह्यातील आष्टी तहसील येथील ८६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; नायब तहसीलदार ओमप्रकाश बाळस्कर यांचे मार्गदर्शन
आष्टी, जि. वर्धा | २९ सप्टेंबर २०२६ :“शासन समजून घेण्यासाठी केवळ पुस्तके पुरेशी नाहीत, तर शासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा अनुभवही आवश्यक आहे,” या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वर्धा यांच्या वतीने ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ हा अभिनव उपक्रम तहसील कार्यालय, आष्टी येथे राबविण्यात आला.या उपक्रमात हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूल, आष्टी येथील 86 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक श्री. उमेश मख, श्री. चौधरी तसेच शिक्षिका सौ. जया कोहळे उपस्थित होत्या. यावेळी मा. नायब तहसीलदार श्री. ओमप्रकाश बाळस्कर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत कशा पोहोचतात, प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी कशी केली जाते आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात तहसील प्रशासनाची भूमिका काय आहे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. शासन व्यवस्था समजून घेणे आणि आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवणे ही काळाची गरज आहे,” या भावनेतून विद्यार्थ्यांना प्रशासनाशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.श्री. विनोद वरकड – प्रस्तुतकार आणि श्री. कपिल गायकवाड – तलाठी यांनीही विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. यामध्ये निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, जनगणना विभाग, सेतू विभाग आणि आवक-जावक विभाग यांचा समावेश होता.विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी केवळ माहिती ऐकून न घेता अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत विविध शासकीय प्रक्रिया व सेवांबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नोत्तरातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि प्रशासन समजून घेण्याची उत्सुकता दिसून आली.हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. शारदा ढोले यांनी उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासन समजून घेण्याची संधी मिळणे ही अत्यंत उपयुक्त बाब असल्याचे सांगितले. अशा अनुभवातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक व्यापक होते आणि भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून घडण्यास त्यांना दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले. ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ हा केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थी आणि शासन यांच्यातील संवादाचा पूल उभारण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देत त्यांच्या मनात शासन व्यवस्था, नागरिकांचे अधिकार आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होत आहे.या उपक्रमासाठी अमृत वर्धा जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश पंडितराव खराटे तसेच जिल्हा उपव्यवस्थापक (DEO)श्री.धीरज राठी यांचे मार्गदर्शन लाभले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment