युवक हे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगत त्यांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर झाल्यास समाजाच्या विकासाला मोठी गती मिळू शकते .
रायगड, माणगाव: महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ग. द. तटकरे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 'अमृत युवा ऊर्जा' या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांमधील ऊर्जा, उत्साह आणि क्षमतेला सकारात्मक व विधायक दिशा देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व आणि राष्ट्र निर्मितीची भावना रुजवणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे संस्थापक श्री. सुरेश गोखले यांनी "माझा देश, माझी कर्तव्ये" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)चे रायगड जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश विनायक मराठे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अमृत संस्थेचे रायगड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. मंगेश भागुराम ढेबे उपस्थित होते.
युवक हे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगत, त्यांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर झाल्यास समाजाच्या विकासाला मोठी गती मिळू शकते, असे श्री. गोखले यांनी स्पष्ट केले. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजाप्रति असलेली आपली जबाबदारी ओळखून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment