तहसील कार्यालयाच्या प्रत्यक्ष भेटीत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले प्रशासकीय कामकाज
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वाशीम यांच्या वतीने ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ हा उपक्रम तहसील कार्यालय, वाशीम येथे उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात २५ विद्यार्थ्यांसह शिक्षक श्री. संभाजी पवार व श्री. वैभव अढाऊ यांनी सहभाग घेतला.
यावेळी तहसीलदार निलेश सुधाकर पळसकर, निवासी नायब तहसीलदार साहेबराव ग्यानुजी नप्ते तसेच नायब तहसीलदार प्रतिभा शालिग्राम चौधरी यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, जनगणना विभाग, सेतू विभाग तसेच आवक-जावक विभाग यांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. तसेच विविध शासकीय सेवा, कार्यालयीन प्रक्रिया आणि नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत विविध शासकीय प्रक्रिया आणि सेवांबाबत प्रश्न विचारले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयातील प्रत्यक्ष कामकाज, प्रशासकीय प्रक्रिया आणि नागरिकाभिमुख सेवांची प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.
यावेळी तहसीलदार निलेश सुधाकर पळसकर , संजय लोणासने( प्राचार्य मादाम कामा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशीम) यांच्या वतीने संजय लोणसने यांनी या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयाची प्रत्यक्ष भेट घडवून आणून प्रशासनाचे कामकाज समजावून देणे ही उपयुक्त बाब असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि अनुभवाधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासनाची प्रशासकीय यंत्रणा, विविध विभागांची कार्यपद्धती तसेच नागरिकांना उपलब्ध असलेल्या शासकीय सेवांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या उपक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाशीम जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत मित्र नंदकिशोर वनस्कर यांनी परिश्रम घेतले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment