महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि विठ्ठल-रखुमाई बाल गणेश मंडळ, विजासन भद्रावती जि. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत या उपक्रमात विविध रोपांची लागवड करण्यात आली.
वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेता वृक्षसंवर्धनाची गरज अधिक अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले.
या उपक्रमात अमृतचे जिल्हा व्यवस्थापक आदित्य सेंगर यांच्यासह विठ्ठल-रखुमाई बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष विजय बोबडे, उपाध्यक्ष सौरभ चिकटे, संयोजक सौरभ घागी, प्रेम धोके तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
वृक्षारोपण केवळ रोपे लावण्यापुरते मर्यादित न ठेवता, लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन, पाणी देणे आणि त्याची योग्य निगा राखणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धन ही केवळ एखाद्या संस्था किंवा मंडळाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशातून पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्यावर भर दिला. भविष्यातील पिढ्यांना निरोगी व स्वच्छ पर्यावरण मिळावे, यासाठी वृक्षसंवर्धनाची चळवळ व्यापक करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
अमृत आणि विठ्ठल-रखुमाई बाल गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश परिसरात पोहोचला. नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन वृक्षारोपण करण्याबरोबरच वृक्षांच्या संगोपनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment