छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय व जिल्हा कार्यालयात तीन दिवसीय मोफत कंटेंट क्रिएशन – शूट आणि एडिट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी अमृतचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून चांगले व्हिडिओ तयार करून स्वतःचा व्यवसाय उभा करता येऊ शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक आणि महिलांना अशीच एक नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय व जिल्हा कार्यालयात तीन दिवसीय मोफत कंटेंट क्रिएशन – शूट आणि एडिट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी अमृतचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी परिमल आर्ट्सचे प्रशिक्षक सारंग साळजोशी आणि श्रीरंग साळजोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी अमृत जिल्हा टीमच्या वतीने दोन्ही प्रशिक्षकांचे स्वागत करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी एकूण २० लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
पहिल्या दिवशी लाभार्थ्यांना कॅमेऱ्याचे मूलभूत नियम, शूटिंग कसे करावे, एक्सपोजर आणि कॅमेरा सेटिंग, कंपोझिशन, फ्रेमिंग आणि कॅमेरा मुव्हमेंट याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष व्हिडिओ शूटिंग कसे करायचे, शूटिंग करताना लाइटिंगचा वापर कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले. केवळ माहिती न देता प्रत्यक्ष कॅमेऱ्याच्या माध्यमातून काम करण्याची संधी लाभार्थ्यांना यावेळी मिळाली.
यावेळी मराठवाडा विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी उपस्थित लाभार्थ्यांना अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी लाभार्थ्यांना या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. आज अनेक ठिकाणी सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करणे, लग्नसमारंभाचे शूटिंग, व्यवसायांची जाहिरात, उत्पादनांचे व्हिडिओ आणि डिजिटल माध्यमातून मार्केटिंग याला मागणी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी अशा कौशल्यांचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे त्यांनी सांगितले. तसेच अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन अमृत सखी मंजू कुलकर्णी, अमृत सखी रूचा शर्मा आणि विनया कुलकर्णी यांनी केले.
अमृतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रशिक्षणातून लाभार्थ्यांना शूटिंग, एडिटिंग, ग्राफिक्स आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएशनचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाणार आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment