युवकांसह बालकांचे श्रमदान; स्वच्छतेसोबत सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश
बोरगाव, ता. आष्टी, जि. वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकारातून ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ हा उपक्रम बोरगाव येथे राबविण्यात आला. नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे, श्रमप्रतिष्ठेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या अभियानात हनुमान मंदिर, राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज चौक तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. अमृतच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील युवक व बालकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात केतन ढोले, हरीश तयकीत, चेतन धोटे, अनिमेश ढोले, सुयोग लबडे, रजत राऊत, रोशन कुडुपले, तेजस कुथे, राज तयकीत, कृष्णा गोडबोले, पार्थ ठाकरे, सोहम पोटपिटे, वेदांत गावंडे, सोहम वाघ आणि तन्मय पिंपळझरे यांनी सहभाग घेतला. यावेळी श्याम कुडुपले यांनी अमृतच्या ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ उपक्रमाचे कौतुक करताना, गावाच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन नियमितपणे श्रमदान करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘स्वच्छ गाव – सुंदर गाव’ हा संदेश देत सहभागी युवकांनी दर रविवारी गावाच्या स्वच्छतेसाठी वेळ देण्याचा संकल्प केला. अमृतच्या या उपक्रमातून स्वच्छतेसोबतच सामाजिक सहभाग आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment