प्रांतीय प्रशिक्षक श्री. कैलास कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक व्यायाम, बौद्धिक विकास, खेळ, प्राणायाम आणि संस्कार यांचा सुंदर समन्वय साधणारे ‘अमृत वर्ग’ प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
मालेगाव : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून विद्याविकास इंटरनॅशनल स्कूल व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मालेगाव येथे ‘अमृत वर्ग’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात अमृतचे प्रांतीय प्रशिक्षक श्री. कैलास कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना प्रार्थना, वॉर्मअप, शारीरिक व्यायाम, प्राणायाम तसेच बौद्धिक क्षमता व एकाग्रता वाढविणाऱ्या विविध खेळ व उपक्रमांचे प्रशिक्षण दिले. यामध्ये ‘४/७ चा बैठा खेळ’, ‘आकाश-धरती-पाताळ’, ‘घुमता किल्ला’, ‘वाघ-बकरी’ तसेच शांती मंत्र आदी उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मालेगाव येथील या प्रशिक्षण शिबिरात शाळेतील प्रत्येक वर्गातील दोन मुले व दोन मुली अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण ९२ विद्यार्थ्यांना ‘अमृत वर्ग’ प्रशिक्षण देण्यात आले. शारीरिक व्यायाम, बौद्धिक खेळ, प्राणायाम व संस्काराधारित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, बौद्धिक क्षमता, एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित करण्यावर भर देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहाराचा दैनंदिन जीवनात समावेश करावा, आई-वडील व शिक्षकांचा आदर करावा तसेच आपल्या शाळेचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी विद्याविकास इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन विद्या पेठकर, मुख्याध्यापिका पल्लवी ठाकरे, शासकीय आयटीआयचे प्राचार्य प्रकाश जैन, अमृतचे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता तसेच प्रशिक्षक श्री. कैलास कुरकुटे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक व्यायाम, बौद्धिक विकास, खेळ, प्राणायाम आणि संस्कार यांचा सुंदर समन्वय साधणारे ‘अमृत वर्ग’ प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment