शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या 'अमृत'ची अनोखी दिनदर्शिका भेटीला

व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते पुणे मुख्यालयात प्रकाशन

शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या 'अमृत'ची अनोखी दिनदर्शिका भेटीला मुख्य फोटो
मुख्य फोटो

पुणे : समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना लाभदायक ठरतील, अशा योजना शासनाकडून राबवल्या जात असतात; मात्र त्यांची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतेच असे नाही. या पार्श्वभूमीवर अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आपल्या योजनांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे अनोखेपण म्हणजे ती १६ महिन्यांची आहे. पुणे येथील मुख्यालयात संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे आज (एक जानेवारी २०२६) प्रकाशन झाले. या वेळी अमृत संस्थेचे निबंधक सिद्धेश्वर वरणगावकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश वाघचौरे, सहायक संशोधन अधिकारी चंद्रकांत बोबडे, विशेष कार्य अधिकारी श्रीराम बेंडे, विशेष कार्य अधिकारी प्रवीण पांडे उपस्थित होते.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. ब्राह्मणांसह अन्य ज्या सुमारे २२ जातींना राज्य शासनाचे कोणतेही स्वतंत्र महामंडळ किंवा योजनांचा लाभ मिळत नाही, ते समाजघटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्या घटकांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्यातून उद्योजक घडवणे, त्यांना उच्च शिक्षणासाठी साह्य करणे, तसेच व्यवसायाला मदत करणे अशा विविध उद्दिष्टांच्या योजना अमृत संस्थेतर्फे राबवल्या जातात. या सर्व योजनांची माहिती या दिनदर्शिकेतून सर्वांना मिळणार आहे. तसेच, योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास किंवा अधिक माहिती घ्यायची असल्यास संपर्क क्रमांकही सोबत देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकाधिक जणांना योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने ही दिनदर्शिका प्रबोधन करणारी ठरेल, असे प्रतिपादन विजय जोशी यांनी केले.

या दिनदर्शिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती १६ महिन्यांची आहे. एक जानेवारी रोजी ग्रेगरियन वर्ष सुरू होते. जगभर ही कालगणना वापरली जाते; मात्र पुरातन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना वैशिष्ट्यपूर्ण आहे. अमृतची दिनदर्शिका एक जानेवारी २०२६पासून सुरू होत असली, तरी तिच्यामध्ये भारतीय पंचांगही समाविष्ट करण्यात आले असून, आगामी शालिवाहन शकदेखील (पराभव नाम संवत्सर) त्यात आहे. म्हणजेच येत्या गुढीपाडव्यापासून पुढच्या फाल्गुन अमावास्येपर्यंत अर्थात एप्रिल २०२७पर्यंतच्या काळासाठीची ती दिनदर्शिका आहे. आध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या एक जानेवारी या कल्पतरू दिवसाच्या औचित्याने या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील सरकारी कार्यालये, तसेच जास्तीत जास्त नागरिकांच्या दृष्टीस पडेल अशा कार्यालयांमध्ये या दिनदर्शिका प्रदर्शित होतील या दृष्टीने सध्या अमृत संस्थेच्या सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांकडून या दिनदर्शिकांचे वितरण जोरात सुरू आहे.

संस्थेविषयी आणि योजनांविषयी अधिक माहितीसाठी लिंक : https://mahaamrut.org.in/

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 02:51 PM News publication time | Views: 482 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 02:51 PM News publication time | Views: 482 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words